राज्यपालांची ऑफर राहुल गांधींनी स्वीकारली

सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन काश्‍मीरात जाण्याची तयारी

नवी दिल्ली – काश्‍मीरातील स्थितीबाबत केंद्र सरकारने नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तेथील नागरीकांची मुस्काटदाबी सुरू आहे अशा स्वरूपाची विधाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यानीं आम्ही राहुल गांधी यांच्यासाठी विमान पाठवू, त्यांनी प्रत्यक्ष काश्‍मीरला भेट देऊन येथील स्थितीची पहाणी करावी आणि मगच या स्थितीविषयीव बोलावे असे आवाहन केले होते. त्याला राहुल गांधी यांनी आज तातडीने प्रतिसाद दिला असून त्यांनी ही ऑफर आम्ही स्वीकारत आहोत असे म्हटले आहे.

आम्हाला राज्यपालांनी दिलेले निमंत्रण मान्य आहे, त्यानुसार सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन मी काश्‍मीरात येऊ इच्छितो. आम्हाला तुमची विमान सेवा नको पण आम्हाला तेथे मुक्तपणे हिंडु द्यावे व लोकांशी संपर्क साधू दिला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कोणत्याहीं राजकीय पक्षाच्या नेत्यांना काश्‍मीरात जाण्यास मनाई केली आहे.

मध्यंतरी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीतराम येचुरी तिकडे गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावरच अडवून ठेवण्याचा प्रकार घडला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांनी मात्र राहुल गांधी यांना काश्‍मीरात येण्याचे जे खुले आवाहन केले आहे त्याला विशेष महत्व दिले जात आहे. आता राहुल गांधी यांनी तशी तयारी दर्शवल्यानंतर राज्यपालांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पहाणे औत्स्युक्‍याचे ठरले आहे.

कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही यावर आपली प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की केवळ राहुल गांधी यांनाच नव्हे तर सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना तेथे जाण्याची अनुमती मिळाली पाहिजे. तशी मागणी आपण संसदेतही केली होती असे थरूर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.