मुंबई :- भारतीय संघाचा एकेकाळचा सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज व सध्याच्या भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याबाबत श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय ऑफ स्पीन गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझ्या गोलंदाजीसमोर द्रविडही गोंधळून जात होता, असे सांगत मुरलीधरनने द्रविडला निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनंतर डीवचले आहे.
मुरलीधरनच्या कारकीर्दीवर आधारित 800 या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी मुरलीधरनने आपली मते मांडली आहेत. माझी गोलंदाजी सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग ज्या उत्तम पद्धतीने खेळायचे तसे द्रविडला कधी जमलेच नाही. माझ्या गोलंदाजीवर त्रिफळा उडू नये यासाठी सचिनसारखे फलंदाज मला ऍक्रॉस द लाईन फारसे खेळायचे नाहीत. तसेच सचिन तर माझ्या प्रत्येक चेंडूचे आकलन खूप लवकर करायचा हे देखील मी अनुभवले आहे. द्रविड मात्र, या सगळ्यात खूपच कमी पडायचा, असेही मुरली म्हणाला.
सध्याच्या भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड महान फलंदाजांच्या यादीत निश्चितच वरच्या स्थानी आहे मात्र, त्याच्या फलंदाजीतही काही दोष होते. माझ्या गोलंदाजीवर तो कधीही मनमुराद फलंदाजी करु शकला नाही. तो सतत दडपणाखाली असायचा व हे मी अनेक सामन्यात पाहिले आहे, असेही त्याने सांगितले.
टीका केवळ चित्रपटाच्या चर्चेसाठीच…
स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलेला अभिनेता मधुर मित्तल हाच 800 या चित्रपटात मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ होत आहे त्याच्या एक दिवसानंतर म्हणजेच 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची जास्तीत जास्त चर्चा व्हावी हाच द्रविडवर टीका करण्याचा हेतू असावा, असी टीकाही काही समिक्षकांनी केली आहे.