मुंबई – राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यामुळे अजित पवारांच्या गटात एकूण 40 आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे जी -20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कार्यालय शनिवारी बंद आहे. पण तरीही एका मेलद्वारे शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल करण्यात आले आहे. मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले 4 विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे.
बंडखोरीनंतर अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता, तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. 2022 मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याची देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.
निर्णय आमच्या बाजूने
“मी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. शरद पवार गटाने कितीही दावे फेटाळले तरी त्याने कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास केला आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, ते पाहता निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे,’ असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.