बेंगळुरू – भारतीय संघाचा माजी कर्णधार व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविड याने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी इच्छुक नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी द्रविडने दिलेला नकार खूपच निर्णायक ठरला असला तरीही आता बीसीसीआयला विविध नावांवर विचार करावा लागणार आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच रवी शास्त्रींनंतर कोणाची नियुक्ती करायची त्यासाठी याच आठवड्यात अर्ज मागवले जाणार आहेत. याचसंदर्भात बीसीसीआयने द्रविडला प्रशिक्षक पदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, द्रविडने हा प्रस्ताव मान्य करण्यास नाकार दिला आहे.
शास्त्री यांची मुदत यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धा झाल्यावर संपत आहे. येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान अमिराती आणि ओमानमध्ये ही स्पर्धा होणार आहे. शास्त्री यांच्यासोबतच भारतीय संघाच्या सपोर्टिंग स्टाफमधील आणखी काही व्यक्ती आपले पद सोडणार आहेत. यामध्ये गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हे देखील पद सोडत आहेत.
संगणक तज्ज्ञ व ऍनालिस्ट निक वेबही आपला करार वाढवण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळेच नवीन प्रशिक्षकांचा शोध बीसीसीआयने सुरू केला आहे. यापूर्वीही द्रविडने 2016 आणि 2017 साली अशीच ऑफर नाकारली होती.
धोनीच्या सल्ल्याचा लाभ होईल – शास्त्री
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीला मेंटॉर म्हणून निवडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत धोनीच्या सल्ल्यांचा कर्णधार विराट कोहलीला निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. धोनी हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. आयसीसी स्पर्धांमधील तुम्ही त्याची कामगिरी पाहिली तर त्याचे महत्त्व पटते, असेही ते म्हणाले.