नवी दिल्ली – बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांतील मानाची समजली जात असलेली विनू मांकड करंडक स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील नागालॅंडविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशचा गोलंदाज वासू वत्सने विक्रमी कामगिरी केली आहे. वासूने 19 वर्षांखालील या स्पर्धेत नागालॅंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेताना एकाच डावात तब्बल आठ बळी मिळवले आहेत.
त्याच्या गोलंदाजीसमोर नागालॅंडचा केवळ 22 धावांत खुर्दा उडाला. या 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशच्या संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 358 धावा केल्या. त्यात कर्णधार आराध्य यादवच्या 131 धावांच्या खेळीचा समावेश होता. त्याच्याशिवाय सलामीवीर अर्णव बलियानने 72 धावांची खेळी केली. तर, स्वस्तिकने 49 धावा केल्या.
विजयासाठी 359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नागालॅंड संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे फलंदाज उत्तर प्रदेशच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. वासूच्या भेदक गोलंदाजीसमोर नागालॅंडचे तब्बल नऊ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. सुजल प्रसादने संघासाठी सर्वाधिक सात धावा केल्या, तर तेजसिली सॅविनोच्या बॅटमधून दोन धावा आल्या. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज वासू वत्सने 8 बळी घेत एकहाती सामना जिंकून दिला.
वासूने या सामन्यात अफलातून गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या सात षटकांच्या स्पेलमध्ये चार धावा देत आठ बळी घेतले. त्याने तीन षटके निर्धाव टाकली. नागालॅंडच्या डावातील 11 व्या षटकात त्याने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर अनुक्रमे सुजल प्रसाद, बामिबे नपनमय आणि ख्रेवित्सोला यांना सलग तीन चेंडूंवर बाद करत हॅट्ट्रिक साकार केली.
नागालॅंडच्या एकूण 22 धावांच्या डावात त्यांना तब्बल 13 धावा अतिरिक्त मिळाल्या. उत्तर प्रदेशने हा सामना तब्बल 336 धावांनी जिंकला.