पॅरिस – स्पेनचा अव्वल मानांकित टेनिसपटू व गतविजेता राफेल नदाल याने अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत दुसरी फेरी गाठली.
त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात इगोर गेरासीमोव्हचा 6-4, 6-4, 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. या स्पर्धेचे तेरावे विजेतेपद मिळविण्यासाठी नदाल सज्ज आहे. करोनाच्या धोक्यामुळे त्याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, आता या स्पर्धेत त्याने धडाक्यात पुनरागमन केले आहे. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅक्डोनलशी होणार आहे.
त्यापूर्वी, झालेल्या लढतीत डॉमनिक थिमने माजी अमेरिकन स्पर्धा विजेता मरिन सिलीच याचा 6-4, 6-3, 6-3 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला व दुसरी फेरी गाठली. फ्लशिंग मेडोजवर झालेल्या गेल्या महिन्यातील स्पर्धेत थिमने विजेतेपद मिळवले होते व या स्पर्धेचेही विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाल्याचे मत व्यक्त केले होते.
यापूर्वी थिमला या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची दोन वेळा संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी जागतिक अग्रमानांकित स्पेनचा राफेल नदालकडून त्याला दोन्ही वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. थिमचा या फेरीतील सामना अमेरिकेचा जॅक सोकशी होणार आहे. सोकने पहिल्या फेरीत रेली ओपेल्काचा 6-4, 6-4, 6-3 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे.