पिंपरी – शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदी पाठोपाठ आता पुणे व पिंपरी चिंचवड शहराची विभागणी करणारी मुळा नदीही फेसाळली आहे. पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात नदीचे दोन दिवसांपासून विदारक परिस्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासन नद्यांच्या प्रदुषणाबाबत उदासिन असल्याचे दिसत आहे.
पिंपरी व पुणे हद्दीत वाहणारी मुळा नदी पिंपळे निलख भागात पांढऱ्या पाण्याने फेसाळली असून, पाण्याला दुर्गंधी येत आहे. मुळा नदीतील पाण्यावर गेल्या दोन दिवसांपासून पांढरा फेस तयार होत आहे. मुळा नदीच्या पाण्यात रसायनयुक्त पाणी व सांडपाणी थेट नदीत जास्त असून या नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले आहे. त्यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नदीच्या प्रवाहात बांधकामांचा मानवी हस्तक्षेप, कचरा, काठावरील नैसर्गिक वनस्पतींचा नाश, सांडपाणी या गोष्टी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरत आहेत. त्यामुळे केवळ नदी प्रदूषित होत नसून नदीचे पाणी वापरणाऱ्या प्राणी आणि माणसांच्या आरोग्यासाठीही घातक ठरत आहे.
मुळा नदी उत्तरेकडून पुण्याच्या वायव्य दिशेकडे वाहते. पौड, लवळे, नांदे व हिंजवडी, कस्पटे वस्ती आणि बालेवाडी ही उपनगरे ओलांडून पिंपरी-चिंचवडमार्गे ती पुणे शहरात प्रवेश करते. पुण्याच्या मुळा व मुठा या दोन्ही मोठ्या नद्या शहरातील संगम पुलाजवळ एकत्र येतात. रांजणगाव या ठिकाणी या नद्या मोठ्या भीमा नदीत विलीन होतात.
मुळा नदीबाबत
पुण्यातून २२ किलोमीटर वाहणारी मुळा नदी पश्चिम घाटात उगम पावते. सह्याद्री पर्वतरांगांत असलेल्या मुळेश्वराजवळील एका प्राचीन झाडाच्या पायथ्याशी होतो. त्यातून बरेच छोटे नाले किंवा प्रवाह घाटाच्या पायथ्याशी एकत्र येतात. तिथे दगड आणि चिखलातून वाट काढीत खोरे तयार होते. याच खोऱ्यातून मुळा नदी वाहते. बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या मुठा व भीमा नद्यांना ती मिळते.
सांडपाणी व्यवस्थापनावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून गेल्या दोन दिवसांपासून मुळा नदी पात्रातील पाण्यावर पांढरा फेस दिसत आहे. असा प्रकार वारंवार पाहायला मिळत आहे. नदीचे गटार झाले आहे. नदी स्वच्छतेच्या कामाकडे सर्व पातळ्यांवर लक्ष द्यायला पाहिजे.
– शिरीष साठे, सामाजिक कार्यकर्ते
पिंपरी चिंचवड महापालिका नदी प्रदुषणाबाबत जागृत असून नद्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पथक काम करत आहे. मुळा नदीची पाहणी करुन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण व जलनिस्सारण विभाग, महापालिका