भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रांगा

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच करोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने  कोव्हिड बाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज मध्य रेल्वे, मुंबई विभाग मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. करोनासंबंधित नियमांचे पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-19 नियमांचे पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.