स्थानिक प्रशासन उपाययोजनांबाबत अलर्ट
शिरूर – शिरूर शहरात होम क्वारंटाइनचे सातजण आहेत. हे सर्व परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या डाव्या हातावर प्रशासनाने शिक्के मारले आहेत, असे लोक फिरताना आढळल्यास त्वरित पोलिसांना सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
करोना व्हायरसचा प्रादूर्भाव व संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी नियम पाळणे व शिरूर नगरपालिका व शिरूर पोलीस स्टेशन यांच्यावतीने शिरूर शहरवासीय व व्यापारी यांच्यासाठी आचारसंहिता तयार केली असल्याची माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
शिरूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने आज सायंकाळी शिरूर शहरातील किराणामाल असोसिएशन, ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशन, भाजीपाला व्यवसायिक, दूध डेअरी असोसिएशन यांची बैठक बोलावण्यात आली होती.
उद्यापासून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात संचार बंदीबाबत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना तहसीलदार लैला शेख यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना दिल्या. शिरुर नगर परिषद प्रशासनानेही नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी
सूचना दिल्या.