पुणे – पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अ गटात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने पहिला विजय नोंदविला. तर 22 यार्डस अ गटात दुसरे स्थान पटकावत 0.264 नेट सरासरीच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक मारली.
पीवायसी हिंदू जिमखाना व पूना क्लब मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटाच्या लढतीत सोहमी शिंदे, श्रेयश वालेकर आणि यश माने यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 22 यार्डस संघाचा 17 धावांनी पराभव केला. पीवायसी हिंदू जिमखाना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 45 षटकात 7 बाद 246 धावा केल्या. सलामीची जोडी सोहम शिंदेने 63 धावा व श्रेयश वालेकरने 52 धावा करत 121 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर यश मानेने 57 धावा चोपल्या. यशला स्वराज चव्हाण नाबाद 19, आदर्श बोथरा 17, अखिलेश गवळी 14 यांनी सुरेख साथ देत संघाला 246 धावांचे आव्हान उभे करून दिले. 22 यार्डसकडून अथर्व शिंदे, अमन मुल्ला, दिलीप यादव, गौरव कुमकर, तेजस तोलसणकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात 22 यार्डस संघ 45 षटकात 8 बाद 229 धावांपर्यतच मजल मारू शकला. यामध्ये अमन मुल्लाने एकाबाजूने लढताना 131 चेंडूत 15 चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 144 धावांची खेळी केली.
दुसऱ्या सामन्यात रोहित चौधरीने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने पूना क्लबचा 6 गडी राखून पराभव केला. व्हेरॉक संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे पूना क्लबचा डाव 44.5 षटकात 182 धावावर आटोपला. प्रत्युत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने हे आव्हान 41.1 षटकात 5 बाद 185 धावा करून पूर्ण केले.