‘पालखी मार्ग’ होणार ‘भक्ती मार्ग’; वाचा गडकरी काय म्हणाले

पुणे  – जगद्गु‌रू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम येत्या दीड वर्षांत पूर्ण होईल. मात्र, हा मार्ग केवळ रस्ता म्हणून न होता “भक्ती मार्ग’ व्हावा, यासाठी एक छोटा भक्त म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भक्तांनी त्यांच्या कल्पनेतून हा भक्ती मार्ग आणखी सुंदर कसा होईल, यासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाल सुरुवात झाली आहे. आळंदी, पुणे, सासवड, लोणंद, फलटणमार्गे माळशिरस ते पंढरपूर असा हा महामार्ग असणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू, पुणे, सोलापूर रोडने पंढरपूर असा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी बारा हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम चार टप्प्यात सुरू झाले आहे. तर तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी तीन टेंडर आले आहेत. त्यानुसार येत्या दीड महिन्यांत हे कामही सुरू होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

 

 

भक्ती मार्गावर अभंग, ओव्या

रस्ते तयार होतात, मात्र ज्या संतांनी आपल्या अभंग, ओव्यांतून एक चांगली दिशा दिली त्या संताचे कार्य, साहित्य सर्वांपर्यंत पोहचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ओव्या आणि तुकाराम गाथेतील अभंग हे मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला ऐकायला यावेत, वाचता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत कसाप्रकारे याची मांडणी व्हावी, याचा सूचना भक्तांनी द्यावात, असे गडकरी म्हणाले.

 

 

गाथेतील वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावणार

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये अनेक वृक्षांचे उल्लेख केले आहेत. हे वृक्ष पालखी मार्गावर लावण्याचा विचार आहे. हे सुशोभिकरण आणि सुंदरता कायमस्वरूपी रहावी, याबाबत तज्ज्ञांची कमिटी तयार करून या संपूर्ण भक्ती मार्गाचे नियोजन करण्यात येणार आहे.

 

 

पालखी मार्गावर गवत आणि टाइल्स

आषाढी वारीमध्ये अनेक वारकरी अनवानी चालतात. त्यावेळी उन्हामुळे पाय भाजणे, पाया दगड, काटे टोचतात. त्यामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूला या वारकऱ्यांना चालण्यासाठी वेगळा मार्ग करायचा. त्याठिकाणी टाइल्स लावून गवत लावा. जेणेकरून वारकऱ्यांचे पाय भाजणार नाही. त्यासाठी चर्चा सुरू आहेत. गवतावर चालल्यामुळे वारकऱ्यांचे पाय पोळणार नाहीत, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहे. फरशी टाकून गवत लावायचे आहे, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली.

 

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे दोन्ही संतांवर माझी खूप श्रद्धा आहे. या मार्गाचे काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य असून, हा मार्ग भक्ती मार्ग व्हावा, प्रत्येकाला या मार्गावर प्रसन्न वाटावे, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिक आणि भक्तांनी त्यांच्या सूचना www.palkhimarg.com या ई-मेलवर पाठवाव्यात.

– नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.