नवी दिल्ली – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन पुढील वर्षाच्या पूर्वार्धामध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पुतीन याच वर्षाच्या अखेरीस भारत भेटीवर येणार होते. मात्र करोनाच्या साथीमुळे त्यांचा हा दौरा लांबणीवर पडला होता, असे भारतातील रशियाचे राजदूत निकोलाय कुर्दासेव यांनी सांगितले.
करोनाच्या साथीमुळे प्रत्यक्ष भेटीवर खूप मर्यादा आल्या आहेत. द्विपक्षीय संबंध कायम भेटीगाठींवर जपले जाऊ शकतात. मात्र त्या भेटींवरील मर्यादा यावर्षी खूप तीव्र होती. मात्र तरिही भारत-रशिया दरम्यानचे आर्थिक, राजकीय संवाद कधीच क्षीण झालेले नाहीत. द्विपक्षीय शिखर परिषद या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणे अपेक्षित होते.
या शिखर परिषदांची तयारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. मात्र करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दोन्ही देशांकडून ही शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुतीन पुढील वर्षी पूर्वार्धात भारत दौऱ्यावर येण्याची आशा आहे, असे कुर्दासेव यांनी सांगितले.
रशियामध्ये विकसित केल्या गेलेल्या “स्पुटनिक-5′ या लसीच्या खरेदीबाबतच्या कराराबाबत पुतीन यांच्या भेटीपूर्वी चर्चा पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुक्त व्यापारी करारही केला जाण्याची शक्यता आहे. भारत आणि रशिया दरम्यानच्या अनेक व्यापारी आणि आर्थिक करारांबाबतही पुतीन यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.