सातारा (प्रतिनिधी) – लष्करात सिक्किममध्ये सेवा बजावणारे चिंचणेर निंब (ता. सातारा) गावाचे सुपुत्र सुजीत नवनाथ किर्दत (वय 37) यांना रविवारी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. ( Sujit Kirdat martyr in Sikkim in accident)
बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या 106 रेजिमेंटमध्ये हवालदारपदावर किर्दत सेवा बजावत होते. रेजिमेंटच्या सूत्रांनी साताऱ्यात जिल्हा सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी विजय पाटील यांना या घटनेची माहिती दिली. किर्दत यांच्या पश्चात वडील नवनाथ, पत्नी सुवर्णा, मुलगा आर्यन, मुलगी इच्छा व भाऊ अजित असा परिवार आहे. किर्दत हे 5 डिसेंबर 2000 रोजी लष्करात भरती झाले.
भारत- चीन सीमेजवळील नथुला बॉर्डर 17 माईल्स या ठिकाणी रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांना सेवा बजावताना वीरमरण आले. सुजीत यांचे पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण चिंचनेर निंब व सातवी ते दहावी शिक्षण चिंचणेर वंदन येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. सुजीत उत्तम बास्केटबॉलपट्टू होते. ( Sujit Kirdat martyr in Sikkim in accident)
सुजीत यांचे वडिल नवनाथ किर्दत व चुलते शिवाजी किर्दत हे लष्करातील ऑनररी कॅप्टन या पदावरून निवृत्त झाले आहेत. सुजीत यांचे बंधू अजित हेसुध्दा काश्मीर प्रांतात अखनूर सेक्टरमध्ये नायक सुभेदार पदावर कार्यरत आहेत.
त्यांचे पार्थिव मंगळवारी दि. 22 सायंकाळी गावात लष्करी इतमामात आणण्यात येणार आहे. पंधरवडयापूर्वीच सुजीत सुट्टीवर गावाला आले होते. सुजीत किर्दत यांच्या वीरमरणाची खबर समजताच चिंचणेर गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवले. ( Sujit Kirdat martyr in Sikkim in accident)