सिमला,- हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांना कथितपणे धक्काबुक्की केल्याबद्दल राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि कॉंग्रेसच्या अन्य चार आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उर्वरीत कालावधी समाप्त होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आज अधिवेशनातील अभिभाषण संपल्यानंतर राज्यपाल परत जात असताना हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले.
विधानसभेचे सत्र संपल्यानंतर राज्यपाल आपल्या वाहनाकडे निघाले असताना ही घटना घडल्याचे राज्याचे संसदीय कामकाज मंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह कॉंग्रेसच्या पाच आमदारांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. हर्षवर्धन चौहान, सुंदरसिंह ठाकूर, सतपाल रायजादा आणि विनोद कुमार ही अन्य आमदारांची नावे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कॉंग्रेस आमदारांच्या वर्तणुकीची निंदा केली असून असे प्रकार व्हायला नकोत असे त्यांनी म्हटले आहे.