मृद व जलसंधारणची संपूर्ण प्रक्रिया आता ‘ऑनलाईन’

- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा - लोकसहभागातून होणाऱ्या शेततळ्याचे ई-भूमिपूजन

मुंबई – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले असून, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्याचे गुरुवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने पोक्रा अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या बुलढाणा येथील शेततळ्याचे ई-भूमिपूजन कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव सुशील खोडवेकर, अवर सचिव श्रीकांत आडंगे व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री भुसे म्हणाले, “पोक्रा प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे गावांची माहिती संकलित करण्यात आल्याने ती पुढील हंगामांच्या योग्य नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून नियोजन करावे. ज्या भागात ज्या पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले जाते तिथे संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.”

पोक्रा प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सुमारे चार हजार गावांमध्ये लोकसहभागीय पद्धतीने सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गावांमध्ये प्रत्यक्ष कशी राबविली जात आहे याबाबत कृषीमंत्री भुसे यांनी उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगाव, बीड व बुलढाणा या सात जिल्ह्यांतील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, शेतकरी, कृषी अधिकारी, कृषीताई, तसेच भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. शेततळे बांधताना त्यामध्ये गाळ साचणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला कृषीमंत्र्यांनी दिला.

शेततळी बांधण्याच्या कामात खोदाई यंत्रे उपलब्ध करून भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन केलेले सहकार्य मोलाचे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावांतील ही कामे शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरक आहेत. यापूर्वीही गाळ काढण्याच्या कामात सहकार्य घेतल्याने अनेक ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. यामुळे अनेक होतकरू शेतकरी कुटुंबांसाठी हा आशेचा किरण ठरला आहे, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.

शांतीलाल मुथा म्हणाले, “बुलढाणा जिल्ह्यात गाव पातळीवर सरपंच, पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्याने शेततळी खोदाईच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खोदाई मशीनच्या वाहतुकीचा खर्च वाचवून ही कामे आम्ही गावसमूहानुसार (क्लस्टर) राबवू. या कामाला आता लोकचळवळीचे स्वरुप येत आहे. यामुळे लोकसहभागातून शेततळी उभारणीसाठी बुलढाणा जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात पथदर्शी ठरेल. याकामी समन्वयासाठी गावचे सरपंच हे या चळवळीचे दूत तथा ब्रँड अँबॅसेडर आहेत.”

पोक्रा प्रकल्पाअंतर्गत मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यास सुरुवात झाली असून, कामाच्या प्रमाणात कंत्राटदारांची बिले थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व वेगवान झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.