पुसेगाव – पुसेगाव येथील 35 वर्षीय महिला करोनाबाधित आढळल्याने पुसेगावसह उत्तर खटाव भागातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रशासनातर्फे बाधित रुग्णाच्या घरापासूनचा 300 मीटरचा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. उद्यापासून पुसेगाव पाच दिवस बंद करण्यात येणार आहे.
ही महिला 26 जून रोजी खडकी (ता. माण) येथे तिच्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेली होती.
दि. 28 रोजी ही महिला पुसेगावात आल्यानंतर लगेचच तिच्यासह घरातील 9 जणांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्वारंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी सर्वांचा स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. बुधवारी त्यातील 35 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुसेगाव येथील ग्रामपंचायत, वैद्यकीय अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी, सहायक पोलीस निरीक्षक आदींनी येथे जाऊन बाधित महिलेच्या घराजवळच्या परिसर सील केला. घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. पाच दिवस सर्व दुकाने बंद राहणार आहेत. केवळ मेडिकल दुकाने 9 ते दुपारी 1 तर दुग्ध वितरण सकाळी व संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सुरू राहणार आहेत.
सोसायटी व अन्य संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. आशा, अंगणवाडी सेविका तसेच गावाच्या दक्षता पथकाने घरोघरी जाऊन सर्व्हे केला असल्याचे रणधीर जाधव यांनी सांगितले. पुसेगाव व परिसरात उद्यापासून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून नागरिकांनी विना मास्क व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सपोनि विश्वजित घोडके यांनी केले आहे.