अर्थसंकल्पात केली 78 कोटींची तरतूद
पुणे- जिल्ह्यात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून विमानतळासाठी 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विमानतळासाठी भूसंपादन करण्याच्या कामास गती मिळणार असल्याने विमानतळ खेड तालुक्यात की पुरंदर तालुक्यात? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
पुरंदर येथील नियोजित आंरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारकडून यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्यंतरी या प्राधिकरणाचे विस्तारीकरण करीत त्यामध्ये सिडको, पीएमआरडीए आणि एमआयडीचा समावेश करण्यात आला.
तसेच, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या संस्थांचे हिस्सा देखील राज्य सरकारकडून निश्चित करून देण्यात आला होता. त्यानुसार या एसपीव्हीमध्ये सर्वाधिक 51 टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19 टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी 15 टक्के हिस्सा असणार आहे.