‘गिरे तो भी टांग ऊपर’; पालिकेकडे आणखी चार हजार कोटींच्या ठेवी
पिंपरी -“येस’ बॅंकेत अडकलेल्या 984 कोटी रुपयांमुळे महापालिका अडचणीत येणार नसून महापालिकेकडे आणखी चार हजार कोटींच्या ठेवी असल्याचा दावा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 984 कोटी का अडकले? हे सांगण्याऐवजी महापालिकेकडे आणखी रक्कम शिल्लक असल्याचे सांगत “गिरे तो भी टांग ऊपर’ची प्रचिती आयुक्तांनी आज घडवून आणली.
महापालिकेने “येस’ बॅंकेत गुंतविलेली 984 कोटी रुपयांची रक्कम या बॅंकेवर आर्थिक निर्बंध आल्यामुळे अडकली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी इतर बॅंकात महापालिकेचे किती रुपये आहेत, हे सांगत महापालिकेमध्ये आर्थिक सुबत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. जी खाती उघडली ती निविदा प्रक्रिया राबवूनच उघडल्याचे ते म्हणाले.
महापालिकेची कररुपाने जमा होणारी दैनंदिन रक्कम या बॅंकेत येत होती. त्यामध्ये जमा होणारी काही रक्कम इतर बॅंकातही ठेव स्वरुपात ठेवण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. या बॅंकेकडून सर्वाधिक व्याज मिळणार असल्यामुळे व महापालिकेच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा दावाही आयुक्तांनी यावेळी केला.
कररुपाने बॅंकेत जमा होणारी रक्कम तात्काळ थांबविण्यात आली असून पालिका पातळीवर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. बॅंकेच्या स्थितीबाबत आम्ही व्यवस्थापकीय संचालकांशी काही दिवसांपूर्वीच संवाद साधला होता, त्यावेळी त्यांच्याकडून बॅंकेची स्थिती भक्कम असल्याचे सांगितले होते, असा दावाही हर्डीकर यांनी केला. रक्कम परत मिळविण्यासाठी पावले उचलली जातील, असेही ते यावेळी म्हणाले.
एजन्सीची चौकशी होणार
महापालिकेची कररुपाने जमा होणारी रक्कम गोळा करण्याचे काम येस बॅंकेला देण्यात आले होते. मात्र या बॅंकेने हे काम खासगी एजन्सीला दिले होते. या एजन्सीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने मिळकतकराच्या नोंदीमध्ये फेरबदल करत सहा महिन्यांपूर्वी साडेतीन लाख रुपयांच्या रक्कमेचा अपहारही केला होता. ही रक्कम वसुलीची प्रक्रिया महापालिका राबवित आहे. सहा महिन्यांपूर्वीच या एजन्सीची चौकशी होणे आवश्यक असताना आता बॅंक गाळात गेल्यानंतर या एजन्सीची चौकशी करणार असल्याचे आयुक्तांनी आज जाहीर केले आहे. आयुक्तांच्या या कारभारावर सर्वपक्षीयांनीच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.