पुणे -पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर दरवर्षी उत्सुक असतात. यंदाही वारकऱ्यांचे आगमन होताच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, गणेश मंडळे, महिला मंडळांनी पिण्याचे पाणी, बिस्किटे, भेळ, राजगिऱ्याचे लाडू, केळी, पिशव्या, टोप्यांचे वाटप केले. काहींनी वारकऱ्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली. दुपारपासूनच पालखी मार्गावर पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत रमले होते.
पुणेकरही पालख्यांची वाट पहात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळपासूनच पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले होते. चौकाचौकांत तसेच पालखी मार्गावर दुतर्फा वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. दुपारनंतर वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल होण्यास सुरूवात होताच. अनेक मार्गावर खाद्यपदार्थासह पाणी, शीतपेय वाटप, तर काही ठिकाणी औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच साहित्य ठेवण्यासाठी पिशव्या, डोक्यावरच्या टोप्या रूमाल, मुक्कामाच्या ठिकाणी लागणारे प्लॅस्टिक आदीचे वाटप करण्यात आले.
वातावरण भक्तीमय..
शहरात येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढताच पालखी मार्गासह अन्य मार्गावर भक्तांकडून साऊंडवर भक्तीगीते लावण्यात आली होती. त्यामुळे वातावरण आणखीनच भक्तीमय झाले. पालखी मार्गावरील वारकऱ्यांचे पुणेकर हात जोडून स्वागत करत होते. ठिकठिकाणी पाहुचार केला जात होता. खिचडीचे वाटप केले जात होते.
लक्षवेधी
पादुका दिसल्या अन् भाविक कृतकृत्य झाले
पुणेकरांनी अनुभवली वारकऱ्यांची आदर्शवत स्वयंशिस्त
पाटील इस्टेट चौकात पालखी रथांवर फुलांची उधळण
चौकाचौकांत माऊली… नामाचा एकच जयघोष
वैष्णवांची सेवा
पालख्यांत सहभागी झालेल्या वैष्णवांची सेवा करण्यासाठी पुणेकर नागरिकांसह सार्वजनिक मंडळे, राजकीय व्यक्ती, व्यापारी, सामाजिक संस्था आठवडाभरापासून नियोजन करत असतात. शहरात दोन दिवस पालखी मुक्कामी असल्याने दोन दिवसांच्या कार्यक्रमांचेही नियोजन केले जाते. भजन, कीर्तन, भारूड आदी कार्यक्रम पार पडतात.
रांगोळ्यांच्या पायघड्या
पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर संस्थांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. या रांगोळ्यांमधून सामाजिक संदेश देण्यात आला. या रांगोळ्या बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.