चंदिगढ – पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. राज्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत आप सरकारचे पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. पंजाब राज्यसभेसाठी गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती.
आम आदमी पक्षाने या निवडणुकीत आमदार राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, संदीप पाठक, संजीव अरोरा आणि अशोक मित्तल यांना उमेदवारी दिली होती. तर राज्यसभेच्या पाच जागांसाठी इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिले नव्हते. अशा स्थितीत तांत्रिकदृष्ट्या ‘आप’चे उमेदवार मतदानाशिवाय बिनविरोध विजयी झाले आहेत. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा 31 मार्च रोजी होणार आहे. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या या विजयानंतर आता ‘आप’चे 8 खासदार आहेत. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे दिल्लीतून आधीच 3 खासदार आहेत.