महापालिका आज जाहीर करणार बदल
पुणे – केंद्र आणि राज्यशासनाने लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचे आदेश काढले आहेत. नवीन लॉकडाऊनमध्ये कोणते बदल असतील, हे फक्त केंद्रानेच जाहीर केले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्या घटकांना शिथिलता द्यायची, याचा निर्णय राज्यशासनाने रात्री उशिरापर्यंत न घेतल्याने महापालिकेनेही 3 मे रोजी काढलेले लॉकडाऊनचे आदेश कायम ठेवले आहेत. राज्याच्या आदेशानंतर महापालिका आपल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता तसेच शहरातील कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) सुधारित यादीसह आयुक्त शेखर गायकवाड सोमवारी जाहीर करणार आहेत.
चौथे लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथा टप्पा हा पहिल्या तीनपेक्षा वेगळा असणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या लॉकडाऊमध्ये अनेक घटकांना शिथिलता मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार, केंद्राने आपले आदेश काढत अनेक घटकांना सूट दिली आहे.
मात्र, राज्यशासनाने रात्री उशिरापर्यंत कोणाला सूट द्यायची, रेड झोनबाबत काय निर्णय असेल, याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे महापालिकेनेही रविवारी केवळ शहरातील कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्राचा) आढावा घेतला. त्यात रुग्ण कमी झालेला काही भाग कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात आला आहे, ज्या भागात मागील लॉकडाऊनमध्ये नवीन रुग्ण वाढले तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतेही आदेश न आल्याने 3 मे रोजी महापालिका आयुक्तांनी काढलेले आदेशच पुढे लागू राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे आदेश लागू राहतील, असे 3 मेच्या आदेशात म्हटले होते.