प्रशासनाला शेतकऱ्यांच्या दूध दराचे वावडे का?

चाफळ (रघुनाथ थोरात)- शेतीला पूरक असा पशुपालन व्यवसाय अलीकडील पंधरा ते वीस वर्षांमध्ये अनेक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनला. सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या तरूण वर्गाने बॅंकांची कर्जे घेऊन पारंपारिक दुध व्यवसायाला खऱ्या अर्थाने मोठे व्यवसायिक स्वरूप प्राप्त करून दिले. मात्र, गेल्या सहा महिन्यापासून दुधाचे दर ढासळले असून शासनाला शेतकऱ्यांच्या दुध दराचे वावडे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुधसंघाचा मलईवर डोळा असल्याने शेतकऱ्यांचा काळजाचा ठोक चुकत आहे.

निवारा शेड त्याचबरोबर मुक्त गोठा पध्दती, मिल्कींग मशीन, कडबा कुट्टीमशीन अशा भौतिक सुविधा करत आधुनिक पध्दतीने मोठी गुंतवणूक तरूण शेतकऱ्यांनी व्यवसायात केली आहे. जनावरांच्या चारा व्यवस्थापना बरोबरच पशुखाद्य व्यवस्थापनही महत्वाचा भाग त्याशिवाय अपेक्षित दुध उत्पादकता जनावरांकडून निर्माण करता येत नाही. त्यासाठी सरकी, गोळी पेंड, गहू भुसा, सुग्रास अशा अनेक पशुखाद्यांचा वापर केला जातो.

पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे आणि दुधाचे दर उतरल्यामुळे राज्यातील शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. मोठ्या कष्टाने उभा केलेला हा व्यवसाय कोलमडण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. वास्तविकपणे शेतामध्ये चारा उपलब्ध करण्यापासून उत्पादित केलेले दुधाला मिळणारा दर अत्यंत कमी आहे. सध्या दुध उत्पादनावर होणारा खर्च आणि मिळणारा मोबदला यामधील तफावतीची दरी ही खुप मोठी आहे.

एकीकडे आज गाईच्या 3.0 फॅटच्या एक लिटर दुधाला 16 ते 17 रूपये दर मिळतो. तर दुसरीकडे एक लिटरच्या पाणी बॉटलसाठी वीस रूपये मोजावे लागतात, हे भयावह वास्तव आहे. दर दहा दिवसांनी मिळणारे दुधाचे बील पशुखाद्यावरच खर्च होत आहे. व्यवस्थापन, भांडवली खर्च हे सर्व अंगावर पडत असल्याचे चित्र आहे. सध्या सहकारी आणि खाजगी दुध संस्था 16 ते 18 रूपये प्रतिलिटरप्रमाणे गाईच्या दुधाची खरेदी करतात. आणि त्याची शहरांमध्ये 50 ते 60 रुपये प्रति लीटरप्रमाणे विक्री केली जाते. ही दराची खुप मोठी तफावत आहे.

दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण हे गावातील संकलन केंद्रांपासून सहकारी तसेच खाजगी तत्वावरील दुध संघांपर्यंत दुधावरील मलई खाणाऱ्या बोक्यांची एक मोठी लॉबी कार्यरत आहे. शासनाने सर्व बाजूंचा गांभीर्याने विचार करून तिची खोलवर रुजलेली पाळेमुळे उध्वस्त करणे आवश्यक आहे. संकलन केंद्रामध्ये वजन काट्यावरील होणारी काटामारी तसेच मिल्कींग मशीनमध्ये अंतर्गत छेडछाड करून दुधाचे फॅट्स तसेच एसएनएफमध्ये होणारी काटछाट यासर्व बाबी गोठ्यातील शेणा-मुतामध्ये आयुष्य घालवणाऱ्या शेतकऱ्याच्या माथी मारल्या जात आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पशुखाद्याचे दर दुपटीने वाढले आणि दुधाचे दर घसरले त्यामुळे दुधउत्पादक शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे.

श्री. सुनील सुर्यवंशी,दुध उत्पादक शेतकरी – चरेगाव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.