पुणे, दि. 1 -केंद्रशासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुण्याने यंदा नववा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी शहराला पाचवा क्रमांक मिळाला होता. तर, राज्यातील स्वच्छ शहरांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून, पिंपरी-चिंचवड शहर 19 व्या क्रमांकावर गेले आहे. केंद्र शासनाने शनिवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. तर, शहराला या वर्षीही कचरामुक्त शहरात थ्री-स्टार रॅंकिंग कायम आहे.
केंद्रशासनाकडून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 45 शहरांमध्ये पुणे महापालिका एक वर्ष वगळता महापालिका पहिल्या दहा क्रमांकाच्या शहरात सातत्याने स्थान मिळवत आहे. मात्र, यावर्षी थेट 4 क्रमांकांनी घसरण झाली गेली आहे. तर महापालिकेस “ओडीएफ फ्री’ (लोटामुक्त) शहरांच्या यादीत “प्लस प्लस’ हा दर्जा मिळालेला आहे. करोनानंतर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी महापालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. फाइव्ह स्टार रॅकिंग मानांकनासाठी जाहीर केलेल्या निकषांत महापालिकेस आवश्यक तेवढे गुण न मिळाल्याने महापालिकेस तीन स्टारवरच समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, शहराची वाढलेली हद्द, शहरातील तलावांची तसेच नदीची स्वच्छता यामुळे महापालिकेचे गुण घटले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात यंदाही दुसऱ्या क्रमांकावर समाधान
पुणे शहराने यंदा राज्यात स्वच्छतेत दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. तर, नवी मुंबई महापालिका राज्यात यंदा आणि मागील वर्षीय पहिल्या क्रमांकावर होती. विशेष म्हणजे, यावर्षी महापालिकेस राडारोडा प्रकल्पासाठी चांगले गुण मिळालेले असून या सर्वेक्षणात नागरी सहभाग गटातही पालिकेस चांगले गुण मिळालेले आहेत. मात्र, त्यानंतरही एकूण मानांकनात पुणे मागे पडल्याने महापालिकेकडून त्यानुसार पुढील सर्वेक्षणाची तयारी केली जाणार आहे.