पुणे, {प्रभात वृतसेवा}- शहराच्या विकासाची दिशा ठरविणारे महापालिकेचे २०२४-२५ चे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार गुरुवारी सादर करणार आहेत. वेतनाचा वाढलेला खर्च, मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहता अंदाजपत्रक दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
यंदाही अंदाजपत्रकात प्रशासनाने कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे सलग आठव्या वर्षी पुणेकरांवर कोणतीही करवाढ असणार नाही. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे अंदाजपत्रक सादर असल्याने ते प्रशासकाचे अंदाजपत्रक असणार, की निवडणुकांचे? या बाबत उत्सुकता आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच पालिकेकडून नदीकाठ विकसन, समान पाणीपुरवठा योजना, नदीसुधार योजना, समाविष्ट गावांसाठी ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा योजना, पीपीपीवर मोठ्या प्रमाणात रस्ते उभारण्यात येत आहेत.
त्यासाठी पालिकेने आधीच दायित्व घेतलेले आहे. त्यामुळे या वर्षी शहरात नागरी समस्यांचा सामना पुणेकरांना करावा लागला. त्यामुळे यंदा उत्पन्न घटलेले असताना महापालिका आयुक्त जमा आणि खर्चाचा ताळमेळ कसा साधणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.