आज पुण्याचे ‘बजेट’

स्थायी समिती अंदाजपत्रक सादर करणार

पुणे – महापालिकेचे सन 2021-22 चे अंदाजपत्रक स्थायी समिती सोमवारी मुख्यसभेला सादर करणार आहे. सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या खास सभेत हे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मुख्यसभेला सादर करतील. आयुक्त विक्रम कुमार यांनी 30 जानेवारी रोजी 7 हजार 650 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीमध्ये आवश्‍यक ती वाढ सुचवून किंवा अन्य विकास कामांचा समावेश करून हे वाढीव अंदाजपत्रक मुख्यसभेला सादर केले जाणार आहे.

स्थायी समितीमार्फत किमान दीड ते दोन हजार कोटी रुपयांची वाढ सुचवली जाण्याची शक्‍यता आहे. परंतु महसूल वाढ, विविध प्रकल्प, आरोग्य सेवा यांच्याबाबत स्थायीने कोणते निर्णय घेतले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या शिवाय जायका, रस्ते, पाणीपुरवठा वगैरे रखडलेले जे प्रकल्प आहेत त्याला चालना देण्यासाठी किंवा ते वेळेत पूर्ण करण्यासाठी किती तरतूद करण्यात येणार आहे? याशिवाय कोणते नवे प्रकल्प जाहीर केले जाणार आहेत ? करोनाचा विळखा अद्यापही कायम आहे अशा परिस्थितीत त्याच्या उपाययोजनेला निधी कमी पडू न देता अन्य आवश्‍यक असलेल्या विकासकामांसाठीच्या तरतुदीची कसरत स्थायीने कशी केली आहे, याविषयी पुणेकरांना औत्सुक्‍य आहे.

करवाढ या आधीच स्थायी समितीने फेटाळून लावली आहे. तसेच महसुली उत्पन्न वाढवणारच असे रासने यांनी ठामपणे सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर कोणत्या वेगळ्या उपाययोजना स्थायीने प्रस्तावित केल्या आहेत, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणारे आहे.

यंदा ई-अंदाजपत्रक
यंदाचे अंदाजपत्रक ‘ई’ स्वरुपात सादर केले जाणार आहे. www.pmcbudget2021-2022.com या संकेतस्थळावर हे अंदाजपत्रक पाहाता येणार आहे. समाविष्टयोजनांविषयी नागरिकांना सूचना आणि मत व्यक्त करता येणार आहेत. स्थायी समिती अध्यक्षांचे भाषणही या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. अंदाजपत्रकाची सविस्तर माहिती पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असेल. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सर्वांसाठी संकेतस्थळ खुले होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.