13 हजार कंपन्या कॅलिफोर्नियातून बाहेर : टेक्‍सास बनणार “सिलिकॉन हिल्स’

35 टक्के भारतीय झाले अन्यत्र स्थलांतरीत

न्यूयॉर्क – अवघड आणि महागडी कररचना, राहणीमानावरील भयानक खर्च आणि त्रासदायक अनावश्‍यक नियमांमुळे किमान 13 हजार कंपन्यांनी सिलिकॉन व्हॅली अर्थात कॅलिफोर्निया सोडली असून या कंपन्या आता टेक्‍सासच्या भागात पुनर्स्थापित होत आहेत. टेस्ला, ओरॅकेल, हेवलेट पॅकर्डसारख्या अनेक दिग्गज कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी आता टेक्‍सासला स्थायिक होत आहेत.

सिलिकॉन व्हॅलीबाबत आयटी कंपन्यांचा अपेक्षाभंग होत आहे. काही कंपन्यांच्या संचालकांनी सांगितले की, कॅलिफोर्नियात राहणेही महागडे आहे. येथील राहणीमान मूल्य देशाच्या सरासरीपेक्षा 50% जास्त आहे. यामुळे दोन वर्षांत 13 हजार कंपन्यांनी कॅलिफोर्निया सोडले आहे. हे असेच सुरू राहिले तर लवकरच टेक्‍सास नवीन सिलिकॉन व्हॅली असेल. टेक्‍सासमध्ये राहणे स्वस्त आहे. फक्त यातूनच फर्मच्या खर्चात 30% घट होते. तसेच टेक्‍सासचे “सिलिकॉन हिल्स’ या कंपन्यांना अर्धी गुंतवणूक आणि खर्चात सिलिकॉन व्हॅलीचा अनुभव देते.

दरम्यान, “सिलिकॉन व्हॅली’मधील किमान 35 टक्के भारतीयांनी कॅलिफोर्निया सोडून अन्यत्र आपला मोर्चा वळवला असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे आता टेक्‍सासचा डोंगराळ परिसर आता “सिलिकॉन हिल्स’ म्हणून ओळखला जात आहे. टेक्‍सासमध्ये या कंपन्यांना लालफितीतून मुक्ती देण्यासाठी आयटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टेक्‍सास येथे ऍमेझॉन, ऍपल, सिसको, ईबे, फेसबुक, गुगल, आयबीएम, इंटेल, पे पाल, प्रोकोर, सिलिकॉन लॅब्स, डेल सारख्या कंपन्या आधीपासूनच येथे आहेत. या टेक कंपन्यांचे संचालकही टेक्‍सासच्या ऑस्टिन, ह्यूस्टन आणि मियामि य शहरांत स्थायिक होत आहेत. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ईलोन मस्क हे ऑस्टिनमध्ये, तर शटरस्टॉकचे संस्थापक जोनाथन ओरिंगर, कीथ राबाइस आणि डेव्हिड ब्लूमबर्ग सारखे उद्योगपती मियामीत राहतात.

सध्या कॅलिफोर्नियाच्या लोकसंख्येत आणि नोकरीतील वाढ दोघांचा वेग मंदावला आहे. कोरोनामुळे घरूनच काम करण्याची सूट मिळाल्याने सुमारे 1.35 लाख लोकांनी कॅलिफोर्निया सोडले आहे. सिलिकॉन व्हॅलीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 35% घट झाली आहे. त्याचे मुख्य कारण राहणीमानावरील दिडपट खर्च हेच आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.