पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचे चटके दिवसागणिक वाढू लागले आहेत. फेब्रुवारीतच पारा 37 अशांवर पोचला आहे. पाऱ्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू असून, मार्च, एप्रिल आणि कडक उन्हाचा मे महिना अजून बाकी असल्याने यंदाचा उन्हाळा शहरवासियांची चांगलीच परीक्षा घेणार, अशी चिन्हे दिसत आहेत. तसे संकेत हवामान विभागाकडून मिळाले आहेत.
साधारणतः पानगळ सुरू झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते. धुळवडीनंतर उन्हाचे तीव्र चटके बसू लागतात. मात्र यंदा निर्धारित वेळेपूर्वीच उन्हाळा तापू लागला आहे. तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, पारा 37 अंशावर पोहचला आहे. हवामान विभागातर्फे शुक्रवारी शहरात 37 अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला 30 अंशावर असलेला उन्हाचा पारा महिन्याच्या अखेरीस 37 अंशावर जाऊन पोचला आहे. किमान तापमानातही दिवसागणिक वाढ होत आहे. किमान तापमान 10 अंशावरून 19 अंशावर जाऊन पोचले आहे. हवामान विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कडक उन्हाळा जाणवणार असल्याचे यापूर्वीच संकेत दिले आहेत.
एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा 34 ते 39 अंश तर मे महिन्यात 35 ते 39 अंश राहणार आहे. कदाचित पारा चाळिशीही पार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विदर्भाप्रमाणे शहरामध्येही उन्हाळा जाणविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एसी, कुलर झाले सुरू
सकाळी नऊ- दहा वाजतापासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरवात होते. दुपारनंतर ऊन तीव्र होत जाते. अचानक ऊन वाढल्याने पंख्यांचा वेगही वाढू लागला आहे. उन्हाचा वाढता सपाटा लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यातच यंदा एसी व कूलर बाहेर निघण्यास सुरवात झाली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या मार्च महिन्यात तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. सध्याचे वातावरण आणि हवामान विभागाचा एकूणच अंदाज बघता “फेब्रुवारी तो सिर्फ झाकी हैं, एप्रिल-मे अभी बाकी हैं’ असे म्हणायला हरकत नाही.