पुणे – नुकतंच पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पुण्यात बदली झाली आहे. तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने विनयकुमार चौबे यांची नियुक्ती झाली आहे.
चौबे हे राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली झाली आहे. गुप्ता यांनी शहरातील गुंड आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई केली होती.
Thanks for the kind words, Team !
..even though you posted a tweet without my approval for the first time …😄
I am NOT a TOUGH TASKMASTER , Punekars are..:) #ThankYouPune https://t.co/xNVt1vb009 pic.twitter.com/UsuBzlCJTr
— CP Pune City (@CPPuneCity) December 16, 2022
त्यांनी शंभरहून अधिक मोक्काच्या कारवाया केल्या आहेत. तसेच, अनेक रायझिंग गँग, कोयता गँग, अमूक गँगसह उदयाला येणाऱ्यांना वेळीच वेसण घालण्याचे काम देखील केले. त्यामुळे त्यांचा पुणे शहर आणि परिसरात दबदबा होता.
दरम्यान, आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुणेकरांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमिताभ गुप्ता यांची पोस्ट…
पुणेकरांनो… मला तुमच्यासारखे बोलता आणि लिहताही येणार नाही… कारण तुमच्या प्रत्येक मार्मिक शब्दामुळे मला वेळोवेळी काम करण्याची उर्मी मिळाली.. तुमच्या पाट्या अन आम्ही गुन्हेगारांना बसवलेल्या काठ्या… कायमस्वरूपी लक्षात राहतील.. टीमच्या कामामुळे कधी तुमचं प्रेम जास्त झालं… तर कधी आमचं काम त्याहून बरं झालं.
पुणे पोलीस आयुक्त म्हणून २ वर्ष २ महिने अन २६ दिवस मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. आता नवीन जबाबदारी मिळाली असून लवकरच मार्गस्थ होणार आहे. तुमचा माझ्याबद्दल आणि प्रत्येक पोलिसांवर असलेला जिव्हाळा कायम राहील, अशी अपेक्षा आहे.