पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि जे व्हायला नको तेच झाले. आम्हाला त्रास जाणवू लागल्यामुळे करोना चाचणी केली असता, अहवाल पॉझीटीव्ह आला. एवढंच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांनाही करोनाची बाधा झाली. मात्र, डॉक्टरांनी आमच्यावर केलेले उपचार, घेतलेली काळजी यामुळे आज आम्ही ठणठणीत बरे झालो आहे आणि घरी जात आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर आमच्यासाठी देवदुत ठरले त्यांनी आम्हाला जीवनदान दिले, अशी भावना करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले.
दि. 8 एप्रिल रोजी नायडू रुग्णालयात दाखल केलेल्या बाधित रुग्णांना सिम्बॉयासिस रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी आयसीएमआरने दिलेल्या सुचनेनुसार बादगीतांवर उपचार केले जात आहेत. आज (दि.21) एकूण 15 जणांचे 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यांचे दोनवेळा नमुने घेण्यात आले. दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यामुळे 15 जणांना सुखरूप घरी सोडण्यात आले. त्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी काही रुग्णांनी डॉक्टरांप्रती भावना व्यक्त केली.
पुणे स्टेशन परिसरातील एका कुटूंबाने सांगितले, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आम्ही बरे झालो असे सांगत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दुसऱ्या व्यक्तींने प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले, पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू रूग्णालयात नेले. त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो, 20 पैकी 8 जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो.
आम्हाला लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब करोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो. या 15 दिवसात तणाव होता, परंतु डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णालयातील सर्व सदस्य एवढ्या आपुलकीने वागत होते की, जणू काही आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत.
असे सांगत, त्यांनी खूप आपुलकीची भावना निर्माण झाली. नागरिकांनो घाबरु नका, पण काळजी घ्या. शासन आपल्यासाठी खूप काही करीत आहे. सर्दी, ताप, खोकला झाल्यास बिनधास्त दवाखान्यात जा, उपचार करुन घ्या. कोरोनाची लागण झाली तरी हिमतीने सामोरे जा. आपल्यासाठी सर्व यंत्रणा राबते आहे, अशी भावना व्यक्त केली.
लवळे येथील सिंम्बायोसिस रुग्णालयात 155 रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले 15 रुग्ण 8 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. 14 दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. 92 वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील 3 वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्ण होता.
– विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंम्बायोसिस रुग्णालय, लवळे
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला आहे. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
– शेखर गायकवाड, आयुक्त पुणे महानगरपालिका