पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात प्रशासकीय कारभार सुरू असून सर्वसामान्य पुणेकर नागरिक हाच केंद्रस्थानी ठेवून शहराचे कामकाज पाहिले जाईल, असा विश्वास महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व्यक्त केला.
राज्यशासनाकडून शुक्रवारी डाॅ. भोसले यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी आयुक्त डाॅ. भोसले यांनी माजी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून महापालिकेचा पदभार स्विकारला. अतिरिक्त महापालिका आयुक्त डाॅ. कुणाल खेमणार, रविंद्र बिनवडे, विकास ढाकने यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
डाॅ. भोसले म्हणाले की, सध्या प्रशासकीय काळ असल्याने लोकप्रतिनीधी नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्राधान्य दिले पाहिजे. आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. या शिवाय, नागरिकांच्या अपेक्षाही पूर्ण करण्याची गरज आहे. या बाबत सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्येही नागरिकांशी संबंधित कामांचा तातडीने निपटारा होणे महत्वाचे आहे.
महापालिका आयुक्त म्हणून धोरण ठरविणे, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम होईलच, त्याशिवाय क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी, उपायुक्त, अतिरीक्त आयुक्त यांच्यात योग्य समन्वय साधून नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या जातील, असा दावाही डाॅ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वसामान्य पुणेकर नागरीक हाच केंद्र बिंदू असणार आहे. त्या अनुषंगानेच सर्व विभागाचे कामकाज केले जाईल, त्यासाठी आवश्यक ते धोरण, निर्णय घेतले जातील, अत्यावश्यक तसेच आवश्यक विकासकामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील कामे आचारसंहितेत थांबणार नाहीत. – डाॅ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका