पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शहराच्या सर्वांगीन विकासाचा दावा तसेच पुणेकरांना गुणवत्तापूर्ण जीवनशैली कायम ठेवण्याची शास्वती देत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे ११ हजार ६०१ कोटी रूपयांचे अंदापत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी स्थायी समितीत सादर केले. २०२३-२४च्या अंदाजपत्रकापेक्षा तब्बल २ हजार ८६ कोटी रूपयांनी हे अधिक आहे.
त्यामुळे कोणतीही करवाढ नसताना तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत नसताना वेतनाचा वाढलेला खर्च झाकण्यासाठी हे अंदाजपत्रक दोन हजार कोटींनी फुगविण्यात आले आहे. समितीच्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, डाॅ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
मात्र, त्याच वेळी या वर्षासाठी कोणतीही करवाढ केलेली नसल्याने उत्पन्नाचा भार बांधकाम विकसन शुल्क, मिळकतकर तसेच केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरच असणार आहे.
या वर्षीच्या अंदाजपत्रकात शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३३ मिसिंग लिंक रस्त्यांची जोडणी, पीएमपीसाठी ५०० नवीन बसेस. शहरात सर्वसामान्यांना राहण्यासाठी बाणेर येथे रेंटल हाऊसिंग प्रकल्प, केंद्रशासनाच्या अनुदानातून ६०० हेक्टर जागेवर नवीन टीपी स्कीम, पर्यावरण संवर्धनासाठी २०५० पर्यंतचा आराखडा, ८ नवीन उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग, १९ जेनेरीक औषधांचे दुकान, आणखी एक कॅथलॅब, महापालिकेचे कॅन्सर तपासणी केंद्र, कचऱ्या पासून वीज निर्मिती तसेच हायड्रोजन निर्मिती अशा काही नवीन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
आचारसंहितेतच जाणार अंदाजपत्रक
महापालिकेने अंदाजपत्रक सादर केले असले तरी प्रत्यक्षात ते पुढील आर्थिक वर्षात अंदाजपत्रक सुरू होतानाच एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचरसंहिता असणार आहे. तर, ती मे अखेरीस संपेल त्यानंतर पावसाळा संपताच राज्यात विधानसभा निवडणूका असून ही प्रक्रीया या निवडणूका आॅक़्टोबर, नोव्हेंबर,
डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांची आचारसंहिता असेल तर पुढील वर्षी मार्च -एप्रिल २०२५-२६ मध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनास अतिशय कमी कालावधी मिळणार आहे.
गुणवत्तापूर्ण शहराचा दर्जा कायम ठेवण्यासाठी अंदाजपत्रकात विशेष लक्ष देण्यात आले आहे. शहरातील रस्ते, पर्यावरण, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यावर भर देण्यात आला आहे. – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त
गुबगुबीत बजेट
– महापालिकेचे ११ हजार ६०१ कोटींचे अंदाजपत्रक सादर
– गतवर्षीपेक्षा २ हजार ८६ कोटी रूपयांनी अधिक
– करवाढ नाही, खर्च झाकण्यासाठी अंदाजपत्रक फुगविले
– केंद्र, राज्य शासनाच्या अनुदानावरच उत्पन्नाचा भार