पुणे, {प्रभात वृत्तसेवा}: महापालिकेतील पथ विभाग अभियंत्याच्या कार्यालयात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर तब्बल ४८ तासांनी महापालिका प्रशासनाला जाग आली असून, चोवीस तासांत अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभागास दिले आहेत.
त्यानुसार याप्रकरणी पथ विभागाकडून संबधित अभियंता आणि तक्रारदार या दोघांचाही जबाब घेतला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. मंगळवारी दुपारी महापालिकेत ही घटना घडली होती.
मात्र, त्या दिवशी आणि बुधवारीही प्रशासनाकडून याप्रकरणी काहीच कारवाई करण्यात आली नाही. यावरून माध्यमांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. याशिवाय पथ विभागप्रमुखांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आपची लाचलुचपत विभागाकडे तक्रार
महापालिकेत घडलेल्या या प्रकाराची तक्रार आम आदमी पक्षाकडून लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्याकडे ही रोकड सापडल्यानंतर संबंधित कर्मचारी आणि रोकडही गायब असून, या प्रकरणाचा व्हिडिओ पाहून संबधितांची चौकशी करावी, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.