पुणे, {अंजली खमितकर} – रेस्क्यू सेंटरकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून वनविभागाने कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांच्यावर या आधीच गैरव्यवस्थापनाचा गुन्हा दाखल आहे. या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रात अनियमितता झाल्याचीही वनविभागाची तक्रार आहे. या संदर्भात जाधव यांच्यावर कारवाई करण्याआधी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कळवण्यात आले असून, चार्टशीट बनवण्याचे काम वनविभागाकडून पूर्ण झाले आहे.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमधून एक बिबट्या बाहेर आला आणि त्याचा २४ तासांपेक्षा जास्त काळ प्राणीसंग्रहालयात थरार सुरू झाला. यामुळे केवळ सुरक्षा रक्षकांचेच नव्हे; तर आजूबाजूच्या रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांचीही पाचावर धारण बसली आणि संग्रहालयाच्या बाहेर अनेकांनी गर्दी केली. सोमवारी पहाटेपर्यंत नागरिकांनी या परिसरात गर्दी केली होती. या घटनेने पुन्हा एकदा या रेस्क्यू सेंटरवर जे आरोप लावण्यात आले आहेत, ते अधिक गडद झाले आहेत.
सहायक वनाधिकारी आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी यांनी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतचे निर्देश उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिले आहेत. यावर्षी एप्रिलमध्ये कात्रज येथील “डब्ल्यूएआरआरसी’मध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार वन्यजीव वॉर्डन आदित्य परांजपे यांच्याकडून वनविभागाला मिळाली होती.
यानंतर वन अधिकाऱ्यांच्या पथकाने केंद्राला भेट दिली. त्यांच्या तपासणी अहवालात, पथकाने नमूद केले आहे की त्यांना काही बंदिस्त प्राण्यांच्या बेपत्ता झाल्याच्या नोंदी आढळल्या, काही प्राण्यांना बेकायदेशीरपणे बंदिवासात ठेवण्यात आले आणि अनेक प्राण्यांना वेगवेगळ्या अधिवासात सोडण्यात आले, असा आरोप जाधव यांच्यावर आहे.
त्यानंतर वनविभागाने नेमलेल्या सात सदस्यीय समितीने आणखी एक तपास केला. तथापि, अनुसूचित किंवा सर्वात संरक्षित प्राणी श्रेणीतील प्राण्यांचे व्यवस्थापन करताना गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रतिसाद समाधानकारक नव्हता.
विभागीय तपासणीत गैरव्यवस्थापनाचे पुरावे सापडले आहेत. याबाबतचे निर्देश १३ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आले असून १४ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीही सरकारी कर्मचारी असल्याने त्याबाबत पुणे महापालिकेची परवानगी आवश्यक असल्याने हे प्रकरण महापालिका आयुक्तांकडे परवानगीसाठी पाठवण्यात आले. मात्र आयुक्तांकडून त्यावर “चौकशी’ या शब्दाशिवाय काहीच केले गेले नाही. हा निर्णय झाल्यावर कायदेशीर कार्यवाहीसाठी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल.
प्राणीसंग्रहालयाच्या गैरव्यवस्थापनाचा मुद्दा संवेदनशील असल्याने गुन्हा दाखल करणे हे एक आवश्यक पाऊल आहे. निष्कर्ष अस्वस्थ करणारे आहेत. हे एक बेंचमार्क केस असेल, कारण आजपर्यंत भारतातील प्राणीसंग्रहालय संचालकाविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. वन्यजीव संरक्षण हा गंभीर प्रश्न आहे.- आदित्य परांजपे, वन्यजीव वॉर्डन
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरील आरोपांची चार्टशीट तयार करण्याचे काम वनविभागाकडून पूर्ण झाले आहे. लवकरच ते दाखल केले जाईल. – आशुतोष शेंडगे, सहायक वनाधिकारी