शहरात बाधित संख्या घटत असल्याने दिलासा
पुणे – गेल्या 24 तासांपूर्वी बाधित संख्या दीड हजारांच्या पुढे गेल्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली होती. परंतु, गुरुवारी (दि. 13) बाधित संख्या 1 हजार 91 पर्यंत खाली आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. बाधित संख्येने आज 70 हजारचा टप्पा पार केला आहे. तर, बाधितांपेक्षा करोनावर मात करून बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 1 हजार 156 पुणेकरांनी करोनावर मात केली. दरम्यान, करोनामुळे 35 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत 1 हजार 656 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेकडून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये 15 ऑगस्टपर्यंत शहरातील बाधित संख्या एक लाखांवर पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आज एकूण बाधित संख्या 70 हजार 326 असून, पुढील दोन दिवसांत साधारण 71 ते 72 हजारांच्या आसपास राहील. हा पुणेकरांसाठी दिलासा असून, भविष्यातही अशाप्रकारे बाधितांची संख्या कमी व्हावी असे वाटत असेल तर मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
शहरात आतापर्यंत 3 लाख 42 हजार 589 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आज 6 हजार 335 संशियांची तपासणी केली आहे. एकूण बाधितांपैकी आतापर्यंत 53 हजार 958 बाधित करोनामुक्त झाले आहेत. 76.72 टक्के बाधित या आजारावर मात करून घरी गेले आहेत. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयात 14 हजार 712 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 737 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 448 बाधितांना व्हेंटीलेटर लावण्यात आला आहे. तर 289 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.