दरड कोसळल्याने वाई-मांढरदेवी घाटात वाहतूक काही वेळ ठप्प

मांढरदेव (प्रतिनिधी) – वाई-मांढरदेव घाटात गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही; परंतु या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

मांढरदेव परिसरात आठवडाभर पावसाची संततधार असल्याने डोंगर परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असताना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वाई-मांढरदेव घाटात कोचळेवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर मोठा ओढा परिसरात दरड कोसळली. मोठे दगड, मुरूम, झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.

वाई शहर व एमआयडीसीत जाणारे कामगार, दूध विक्रेते, रात्रपाळी करून घरी परतणारे लोक काही वेळ अडकून पडले होते.बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवली. त्यामुळे दोन तासांनंतर वाहतूक पूर्ववत झाली. बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रीपाद जाधव, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस नाईक प्रशांत शिंदे, अमित गोळे उपस्थित होते.

दरम्यान, घाटात काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. मांढरदेव डोंगरपठारावर उन्हाळ्यात सतत लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. त्यातच जोरदार पावसामुळे डोंगरउतारावरील माती वाहून जात असल्याने दरडी कोसळण्याचा धोका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.