जिलेबीच्या विक्रीला नकार कायम


मिठाई व्यापाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ
सातारच्या ऐतिहासिक परंपरेत खोडा

सातारा (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यदिनी जिलेबी विक्रीवर घातलेली बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील मिठाई व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची गुरुवारी भेट घेतली; परंतु जिलेबी विक्रीस जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिल्याने व्यापाऱ्यांची निराशा झाली. जिलेबी विक्रीवरील बंदी मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन सातारा जिल्हा मिठाई व्यापारी संघटनेच्या पस्तीस सदस्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना गुरुवारी दिले. स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी जिलेबी वाटण्याची सातारा जिल्ह्यातील परंपरा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची आहे.

आपल्या जाज्वल्य राष्ट्रभक्‍तीची अभिव्यक्‍ती करण्याच्या सातारा जिल्हावासीयांच्या या ऐतिहासिक परंपरेत खोडा घालणारा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे; परंतु प्रशासनाला या परंपरेची पर्वा नसल्याचे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना त्याचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी हलवाई व व्यापाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वीपासून तयारी सुरू केली होती. जिलेबीसाठी पीठ लावणे, आचाऱ्यांना अनामत रक्‍कम देणे यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश पंधरवड्यापूर्वीच काढायला हवा होता. आता जिलेबी काढण्याची तयारी झाली असताना विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा.

सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून जिलेबीची विक्री करण्यात येईल. दहावी व बारावी परीक्षांच्या निकालाच्या दिवशीही मिठाईची दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. स्वातंत्र्यदिनाबाबत जनभावना लक्षात घेऊन व व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून प्रशासनाने जिलेबी विक्रीवरील बंदी मागे घ्यावी, असे म्हणणे व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडले.

मिठाई विक्रेते संघटनेचे सचिव चंद्रहास जाधव, कन्हैयालाल राजपुरोहित, भरत राऊत आदींनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली; परंतु इतर जिल्ह्याच्या तुलनेत करोनाचा फैलाव सातारा जिल्ह्यात अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे हा आदेश मागे घेता येणार नाही. व्यापाऱ्यांना यंदा नुकसान सोसावे लागेल, असे सिंह यांनी ठासून सांगितले. काही व्यापाऱ्यांनी जिलेबी देण्याचा प्रयत्न केला, पण ती घेण्यास सिंह यांनी नकार दिला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकमेकांना मिठाई वाटून व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.