वाहनांचा इन्शुरन्स घेतायं… सावधान…!

बनावट इन्शुरन्स पॉलिसीजचा सुळसुळाट

नियंत्रणासाठी यंत्रणाच नाही

विमा उतरवताना तो केवळ अधिकृत विमा कंपनीकडूनच घ्यावा, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून सांगण्यात येते. वाहन फोर या परिवहन कार्यालयाच्या ऍपवर ऑनलाइन व्यवहार करण्याचा सल्लाही दिला जातो. काढलेला विमा खरा की खोटा हे तपासण्यासाठी काही यंत्रणाच नाही. विमा कंपन्यांनाही असे काही तपासण्याची गरज नाही. कारण क्‍लेमच्या वेळी बनावट पॉलिसी आली तर तो क्‍लेम मंजूर होणारच नाही, ही खात्रीच आहे. त्यामुळे अधिकृत कंपनीकडूनच विमा घेणे वाहनधारकांच्या हिताचे ठरणार आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास कमी किमतीचा मोह केवळ आर्थिक ताण देणाराच ठरु शकतो.

सातारा – वाहनांच्या इन्शुरन्सच्या बनावट पॉलिसीजचे पेव सध्या फुटले आहे. अधिक किमतीचा विमा कमी पैशांमध्ये करुन देण्याचे सांगत काही एजंटांनी बनावट इन्शुरन्स पॉलिसी खपविण्याचे तंत्र अवलंबिले आहे. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन वाहन घेतले तर कंपन्या वाहनधारकाला अधिकृत विमा कंपनीकडून विमा घेऊन देतात. मात्र, नंतर विमा वाहनधारकच उतरवतो. त्यावेळी ही फसवणूक होऊ शकते. मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा विमा असणे बंधनकारक आहे. दरवर्षी या विम्याचे शुल्क भरावे लागते.

या विमा रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः चारचाकी वाहनांची थर्ड पार्टी इन्शुरन्सची रक्कम मोठी असते. वाहनांच्या प्रकारानुसार साधारणतः अठरा हजारांपासून ते एक लाखापर्यंत ही रक्कम जाते. छोटा हत्तीसारख्या वाहनांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या दृष्टीने विम्याची रक्कम खूप मोठी असते. त्याची रोजची होणारी उलाढाल, वाहनाचा मेन्टेनन्स आदी विचार केला तर विम्याची वार्षिक रक्कम भरणे त्याला परवडणारे नसते.

हीच गोष्ट ध्यानात घेऊन काही एजंटांनी कमी रकमेत विमा देण्याची क्‍लुप्ती लढवली. उदाहरणार्थ अठरा हजाराचा विमा आठ हजारात करुन देतो, असे सांगितल्यावर रक्कम वाचविण्याचा मोह आवरत नाही. मग बनावट पॉलिसीद्वारे विमा उतरवला जातो. छोटेच नव्हे तर मोठे व्यावसायिकही या मोहात पडतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे वाहनधारकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. कारण दुर्देवाने काही दुर्घटना झाल्यास नुकसानभरपाई देण्याचा आर्थिक ताण मोठा असतो. अधिकृत विमा कंपन्या नुकसानभरपाईचा क्‍लेम मंजूर करतात. पण पावतीच बनावट असेल तर हा क्‍लेम कंपनी देणार नाही. त्यामुळे याबाबत वाहनधारकानेच सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.