पुणे – बुधवार पेठेतील नऊ इलेक्ट्रीकल्स दुकानातून तब्बल 7 कोटी 17 लाख 57 हजार 514 रुपयांचा माल घेऊन, उधारीची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणात महिलेचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. भांगडीया यांनी फेटाळला. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात महिला आणि तिच्या पतीला पंजाब येथून अटक केली होती.
जान्वी प्रल्हाद हरियाणी (रा. मीरा सोसायटी, शंकरशेठ रस्ता) असे तिचे नाव आहे. तिचा पती प्रल्हाद लक्ष्मण हरियाणी यालाही या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 2019 पासून आतापर्यंतच्या कालावधीत घडली. याबाबत सुरेश शिवनदास जेठवाणी (वा 36, रा. कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादींच्या दुकानातून 2 कोटी 46 लाख 87 हजार 697 रुपयांच्या उधारीच्या मालाची खरेदी करण्यात आली होती. इतर आठ दुकानातूनही खरेदी करण्यात आली. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना तिने जामिनासाठी अर्ज केला होता. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.
लॉर्ड आणि जे.पी.इलेक्ट्रो या दोन फर्मच्या माध्यमातून उधारीवर हा माल घेण्यात आला होता. दोन्ही फर्मचा अकाऊंट व्यवहार ती पाहत होती. ती आणि तिचा पती ऑगस्ट 2018 पासून अस्तित्व लपवून पंजाब येथे राहत होते. जामीन मिळाल्यास न्यायालयाच्या सुनावणीस हजर न राहण्याची शक्यता आहे.
दोघांवर चंदननगर आणि घाटकोपर, मुंबई येथेही आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.