पुणे – सोळा वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना यापुढे कोचिंग क्लास लावता येणार नाहीत, ही जाचक अट तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी कोचिंग क्लास संघटनेने केली आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने खासगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सर्वसमावेशकता अशा गोष्टी लक्षात घेऊन हे नियम तयार केल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. या नियमावलीत १६ वर्षाखालील मुलांचे क्लास घेता येणार नाही, ही अट घालण्यात आली आहे. विद्यार्थांचा पाया ज्या वयोगटात भक्कम होतो, त्या वयोगटातील मुलांना क्लास नाही, हे चुकीचे आहे. त्यामुळे ही अट मागे घ्यावी, अशी मागणी राज्यव्यापी कोचिंग क्लासेस संघटनेचे संस्थापक बंडोपंत भुसार यांनी केली आहे.
देशातील बिहार, राजस्थान, गोवा, कर्नाटक या राज्यामध्ये ही नियमावली आधीच लागू करण्यात आली आहे. हाच प्रयत्न आता महाराष्ट्रात करण्यात येत आहे. अशा नियमावलीला आमचा विरोध नसून त्यामध्ये घालून दिलेल्या जाचक अटींना आमचा विरोध आहे. त्या सर्व अटी तात्काळ मागे घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस संचालकांसाठी कोणतीही नियमावली ठरवताना संचालकांचे मत विचारात घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी संघटनेचे भुयार यांनी सांगितले.
खासदारांना निवेदन देणार
केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीतील १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना क्लास लावता येणार नाही, यास विरोध दर्शविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कोचिंग क्लास संघटनेने स्थानिक खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. आठवभरात राज्यातील सर्व खासदारांना याबाबतचे निवेदन दिले जाणार आहे.