पुणे – कोचिंग क्लाससंदर्भात केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नियमावली अन्यायकारक आहे. ही नियमावली केवळ कोचिंग क्लास चालकांसाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या धोकादायक आहे. त्या पार्श्वभूमीवर क्लासेस संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्रच्या वतीने नाशिक येथे येत्या 28 जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी याबाबतची माहिती दिली. कोचिंग क्लासमुळे वाढणाऱ्या आत्महत्या आणि काही ठिकाणी घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन केंद्रशासनाने कोचिंग क्लास बाबत नियमावली प्रसिद्ध केली. या नियमावलीनुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, देशभरातील कोचिंग क्लासेसमध्ये १६ वर्षांखालील मुले शिक्षण घेतात. हे कोचिंग क्लास बंद झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहेच. शिवाय कोचिंग क्लास चालकांची आर्थिक घडी बिघडणार आहे. त्यामुळे नियमालीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा आणि आंदोलन उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
केंद्र शासनाने निश्चितच नियमावली तयार करावी या नियमावली बाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. परंतु १६ वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लास मध्ये प्रवेश दिला नाही तर त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या वयातच त्यांचा पाया मजबूत होतो. करोना काळामध्ये मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यात अशा पद्धतीच्या नियमावलीमुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत होतील, असेही भुयार यांनी म्हटले आहे.