पाथर्डी – श्रीक्षेत्र भगवान गडावरील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरासाठी खरवंडी कासार या गावाने १ कोटी ५५ लाख रुपये विक्रमी देणगी देत संत भगवानबाबांवरील भक्तीची शक्ती दाखविली आहे. गडाचे महंत हभप नामदेव शास्त्री यांना खरवंडी गावात बोलावून ग्रामस्थांनी ही देणगी जाहीर केली आहे. अठरापगड जातीच्या खरवंडी या बहुजन समाजाच्या गावाने जाहीर केलेल्या देणगीच्या मोठ्या आकड्याबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.
संत भगवान बाबांनी नारायण गड सोडल्यानंतर हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा खरवंडी कासारच्या बाजीराव पाटलाच्या आई बनो आईच्या आग्रहामुळे संत भगवान बाबांनी हिमालयात जाण्याचा निर्णय रद्द करत खरवंडी कासार येथे राहून खरवंडी कासार जवळील ५ किमी अंतरावर श्रीक्षेत्र भगवान गडाची निर्मिती केली. भगवानगडाचे काम चालू असताना संत भगवान बाबा हे खरवंडी गावात वास्तव्यास होते. त्यामुळे भगवानगडाची जन्मभूमी ही खरवंडी गाव आहे. श्री क्षेत्र भगवानगडावर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या २६ कोटी रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे खरवंडी कासार गावात ही मंदिर बांधकामासाठी देणगी देण्याचे ठरले.
गडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री यांना गावात आमंत्रित केले. गडावर शेकडो युवकांनी गडावर जात गडावरून रॅली काढत महंतांना गावात आणले. टाळ, मुदुंग, डीजेच्या वादयात गावात मिरवणूक काढत गावकऱ्यांनी देणगीचा आकडा जाहीर केला. नोकरी/व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांच्या देणगीचे आकडे आणखी बाकी आहेत. त्यामुळे हा आकडाही वाढणार आहे. एकंदरीत श्री क्षेत्र भगवानगडाचा भक्तवर्ग गडावरील माऊलींच्या मंदिराला आर्थिक स्वरुपात हातभार लावण्यासाठी सरसावलेला दिसून येत आहे. या भव्य-दिव्य मंदिरासाठी लागणारा खर्च अंदाजे २६ कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे या अभूतपूर्व मंदिरासाठी विक्रमी वर्गणी ही जमा होत आहे.