पुणे –करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये प्रशासनाला ऑक्सिजनच्या नियोजनासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. आता ओमायक्रॉन या नवीन विषाणूची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे भविष्यात करोनाची तिसरी लाट आली तर ऑक्सिजन नियोजनामध्ये वेळ जाऊ नये, प्रत्येका ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाने 65 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले. त्यापैकी 37 कार्यान्वित झाले आहेत. याशिवाय ऑक्सिजन साठवणुकीसाठी 26 लिक्विड टॅंक नियोजन केले असून, त्यापैकी 20 कार्यान्वित झाल्याने ऑक्सिजन निर्मितीबरोबरच जिल्ह्यामध्ये साठवणूक क्षमता वाढली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑक्सिजन साठवणूक क्षमता 675 मेट्रिक टन एवढी करण्यात आली आहे. यामध्ये 211 मेट्रिक टन ऑक्सिजनची साठवणुक खासगी रुग्णालयात करता येणार आहे. ऑक्सिजन प्लांटद्वारे 38 हजार 206 लिटर प्रतिमिनीट (एलपीएम) एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. त्यामध्ये पुणे शहरात 16 हजार 266 लिटर प्रतिमिनीट, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 हजार 50 लिटर प्रतिमिनीट तर ग्रामीण भागात 15 हजार 890 लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे.
65 प्लांटपैकी सर्वाधिक 22 ग्रामीण भागात असून 18 कार्यान्वित झाले आहे. दरम्यान, पुणे महापालिका भागात ऑक्सिजनचे 12 प्लांट कार्यान्वित झाले असून, 6 प्रस्तावित आहेत. लिक्विड टॅंकमध्ये 9 तयार केले असून 3 प्रस्तावित आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वांत कमी तीनच ऑक्सिजनचे प्लांट कार्यान्वित झाले असून, चार बाकी आहेत. तर सहा लिक्विड टॅंक तयार केले असून एक शिल्लक आहे. ग्रामीण भागात सर्वात जास्त बावीस प्लांट तयार झाले असून, अठरा शिल्लक आहेत. लिक्विड टॅंक पाच तयार केले असून, दोन बाकी आहेत.