पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटरला घरघर लागली असताना अन्य एका रुग्णालयाचे डायलिसिस सुरू करण्याची निविदा महापालिकेने प्रसिद्धीला दिली आहे. सरकारी दर वाढले असताना केवळ 400 रुपयात सेंटर चालवायला कोणी घेणार का, की यांचेही कमला नेहरू होणार हे पाहावे लागणार आहे.
महापालिकेतील कमला नेहरू रुग्णालयात 12 डायलिसिस मशिन्स आहेत. ते लायन्स क्लबने चालवायला घेतले आहेत. महापालिकेचा एका डायलिसिसचा दर 400 रुपये आहे. सरकारी दर 1200 रुपये आहे. असे असताना या क्लबला आता 400 रुपयात ते चालवणे अवघड वाटल्याने ते सेंटर बंद ठेवण्यात येत होते. पालिकेने संबंधितांना नोटीस बजावली. त्यानंतर ते सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महापालिकेच्या सात दवाखन्यांमध्ये डायलिसिस सेंटर आहेत. त्यातील कमला नेहरू वगळता अन्य ठिकाणचे सेंटर व्यवस्थित सुरू आहेत. तेथून बंद असल्याबाबत एकही तक्रार अद्याप आली नाही. केळेवाडीतील राऊत दवाखान्यातील सेंटरची मुदत संपली होती म्हणून नवी निविदा काढण्यात आली आहे. कमला नेहरूतील डायलिसिस सेंटर ज्या ठेकेदाराने चालवायला घेतले आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले