पुणे – शहरातील धोकादायकवाडे काढण्यासाठी 91 लाखांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शहरात पावसाळ्याच्या महिनाभर आधीच अतिधोकादायक वाडे (पावसाळ्यात कोसळू शकणारे) उतरवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. यात 65 पैकी 31 वाडे उतरविण्यात आले आहेत. तर उर्वरीत वाडेही उतरविण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
शहरात अनेक वाडे 100 वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. महापालिकेकडून दरवर्षी अशा वाड्यांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर अतिधोकादायक, धोकादायक मात्र दुरुस्तीनंतर वापरता येणारे तसेच कमी धोकादायक (किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेले) असे गट केले जातात. त्यानंतर, धोकादायक वाडा उतरवून घेण्याची नोटीस वाडामालकांना दिली जाते. तर, वाडमालकांना तो उतरविणे शक्य नसल्यास महापालिका स्वत: तो उतरवून त्याचा खर्च वाडा मालकांकडून वसूल करते. यावर्षी आतापर्यंत 65 धोकादायकवाडे आढळून आले असून, त्यातील 31 उतरविण्यात आले आहेत. पण, निम्म्याहून अधिक धोकादायक वाडे मालकांच्या हट्टापायी कोसळण्याच्या स्थितीत आहेत.