पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास मागील तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ग्रामीण क्षेत्रातून एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 10 दिवसांचा कालावधी राहिला आहे.
दरम्यान या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी नावे अंतिम केली जाण्याची शक्यता आहे.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दि.29 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी दि.13 ऑक्टोंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. या निवडणुकीसाठी 978 मतदार आहेत. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये “पीएमआरडीए’ हद्दीतील ग्रामीण भाग (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) गटातून एकूण 30 सदस्य निवडून द्यायचे आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांमधून 22 सदस्य, नगरपरिषद क्षेत्रातून 1 सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांमधून 7 सदस्य निवडण्यात येणार आहे. पीएमआरडीएने नुकताच हद्दीचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे.
निवडणूक चुरशीची होणार
पुणे व पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आहे, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत उमेदवारांची नावे अंतिम केली जाणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीतील तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहरचे पदाधिकारी यांना बोलविण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पसंती क्रमानुसार होणार निवड
पीएमआरडीएच्या महानगर नियोजन समितीची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हांवर होणार नसून, तर ती पसंतीक्रमानुसार घेण्यात येणार आहे. यामध्ये मतदाराला मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोर पसंती क्रमांक लिहायचा आहे.