नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणची पहाणी साठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मध्य रात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे.
युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी, “प्रियंका गांधी वढेरा यांना हरगावमधून अटक करण्यात आली,” असा दावा आपल्या ट्विटमध्ये केला आहे. “शेवटी तेच झालं ते भाजपाला अपेक्षित होतं. ‘महात्मा गांधीं’च्या लोकशाही देशामध्ये ‘गोडसे’ समर्थकांनी भर पावसामध्ये आणि पोलीस दलाच्या तुकड्यांना तोंड देत अन्नदाता शेतकऱ्याला भेटण्यासाठी पोहचलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावमध्ये अटक केली.ही केवळ लढाईची सुरुवात आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो,” असे श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra left for Lakhimpur; earlier visuals from Lucknow pic.twitter.com/5jlWetJftU
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2021
“आजच्या घटनेवरुन दिसून येत आहेत की हे सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी राजकारण करत आहे. हा शेतकऱ्यांचा देश आहे भाजपाचा नाही. पिडितांच्या नातेवाईकांना भेटून मी काही गुन्हा करत नाही. ते आम्हाला का अडवत आहेत? त्यांच्याकडे अटक करण्यासाठी वॉरंट तरी हवं ना?,” असे प्रश्न प्रियंका यांनी उपस्थित केले आहेत.
या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.