पुणे – शहरातील मुख्य रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झालेली असताना उपनगरांमधील गल्ली बोळांमधील क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारात येणाऱ्या 12 मीटर रूंदीच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पालिका आयुक्तांनी 12 मीटरवरील रस्त्यांना मुख्य खात्याला जबाबदार धरले असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र त्यापेक्षा लहान रस्त्यांची जबाबदारी असलेले क्षेत्रीय कार्यालये मात्र खड्डयांवर केवळ कागदोपत्री खर्च दाखवित आहेत.
मागील वर्षी महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही क्षेत्रीय कार्यालयांनी रस्ते, खड्डे तसेच दुरूस्तीसाठीच्या कामांचा अहवाल सादर केला नव्हता, अशीच स्थिती या वर्षीही असून परिमंडळ कार्यालयांच्या अंतर्गत येणारे क्षेत्रीय कार्यालये आयुक्तांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे वास्तव आहे. शहरात सुमारे 1380 कि.मी.चे रस्ते आहेत. त्यातील तब्बल 971 कि.मी. रस्ते हे क्षेत्रीय कार्यालयांच्या अख्त्यारीत येतात. अवघे 409 कि.मी.चे रस्ते मुख्य खात्याकडे येतात.
हे 12 मीटर पेक्षा जास्त रूंदीचे आहेत. तर मुख्य खात्याकडे येणारे रस्ते शहराला जोडणारे तसेच मह्त्वाचे असल्याने मुख्य खात्याकडून त्याची देखभाल दुरूस्ती पाहिली जाते. मात्र, या रस्त्यांना जोडणारे इतर जवळपास 971 किलोमीटरचे रस्ते हे क्षेत्रीय कार्यालयांकडे येतात. त्यामुळे, क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याकडे पूर्णत: दूर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव आहे.
नियंत्रण विभागच नाही…
क्षेत्रीय कार्यालयांकडे या रस्त्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी हे काम केले का नाही याची विचारणा करणारा कोणताही विभाग नाही, अतिरिक्त आयुक्तांकडून परिमंडळ उपायुक्तांना रस्त्यांचा अहवाल सादर करण्यास सूचना केल्या जातात. मात्र. क्षेत्रीय कार्यालयाकडे या सूचनांकडे पाहतही नसल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी रस्त्यांची चाळण झाल्याने पालिका आयुक्तांनी दोष दायित्व कालावधीत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तो देण्यातच आला नाही. काय काम केले हे ही सांगण्यातही येत नाही.