आतून डागडुजी; बाहेर मात्र कचऱ्याचे ढीग
पुणे : जानेवारी महिन्यात होणाऱ्या जी 20 परिषदेसाठी पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याची डागडुजी सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला वाडयाच्या बाहेरील परिसरात मात्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पेशवे गणपतीच्या मागील बाजूस वाड्याच्या सुरक्षाभिंतीच्या आत मोठ्या प्रमाणात झाडाचा पालोपाचोळा तसेच प्लॅस्टिकचा कचरा, खराब झालेले फर्निचर टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सर्व कचरा सिमाभिंतीच्या आतील बाजूस असून, तो प्रशासनास दिसत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शनिवारवाडा पुरात्तत्व विभागाच्या ताब्यात असून, त्याच्या परिसराची स्वच्छता महापालिका प्रशासनाकडून केली जाते. दररोज शनिवारवाड्याला राज्यभरातून पर्यटक भेट देत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दीही असते. त्यामुळे हा परिसर दररोज स्वच्छ ठेवणे अपेक्षित आहे. त्यातच, आता पुण्यात जानेवारी आणि जून 2023 मध्ये जी 20 परिषद होत असून, त्यासाठी 36 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या भेटीच्या दौऱ्यात शनिवारवाड्याची भेट तसेच आतमध्ये असलेल्या लाईट ऍड साऊंड शो चा कार्यक्रमही होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, आतील बाजूस रंगरंगोटी तसेच इतर कामे केली जात आहेत.
मात्र त्याचवेळी शनिवारवाड्याच्या बाहेरील परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे चित्र असून एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा कोणी टाकला आणि आता तो उचलला का जात नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.