पुणे – मोहंमद शाहनवाज शफी उर्फ रहमान आलम या वॉन्टेड दहशतवाद्याचे छायाचित्र महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या दोघा साथीदारांना 18 जुलै रोजी कोथरुड पोलिसांनी वाहनचोरी करताना अटक केली होती. यावेळी पोलिसांना चकवा देत शाहनवाज पळून गेला होता.
कोथरूड पोलिसांनी मोहंमद इम्रान मोहंमद युनूस खान आणि मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी यांना ताब्यात घेतले होते. हे दोन्ही व्यक्ती राजस्थानातील एका गुन्ह्यात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वॉन्टेड यादीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी बॉम्बस्फोटांचा कट रचल्याचेही समोर आले आहे. त्यांच्याकडे तब्बल 500 जीबीचा डेटा सापडला. यामध्ये दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालणारे व्हिडिओ आणि साहित्य होते. तसेच बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि केमिकलही हस्तगत करण्यात आले. त्यांना आसरा देणाऱ्या एकास आणि पैसे पुरवणाऱ्या दोघांना एटीएसने अटक केली. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात त्यांनी बॉम्ब चाचण्या केल्याचेही निष्पन्न झाले. याप्रकरणी आजवर पाच जण अटक करण्यात आले आहेत.
तर वॉंटेड आलम हा मास्टर माइंड असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एटीएसकडे गेल्यावर पथके शाहनवाज याचा माग काढत होती. त्यांनी इतर राज्यांच्या एटीएस पथकांशी समन्वय साधला होता. त्याचा माग काढत असल्याचे कळल्यावर तो जास्त सावधगिरी बाळगेल, म्हणून आजवर एटीएसने अधिकृतपणे त्याबद्दल कोणतीच माहिती जाहीर केली नव्हती. आता मात्र तो अनेक प्रयत्नानंतरही सापडत नसल्याने त्याचे छायाचित्र जाहीर करण्यात आले आहे. आरोपी नेपाळ किंवा बांगलादेशमार्गे पाकिस्तानला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दाढी करून झाला फरार
कोथरुड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्यावर आलमने घरी जाऊन दाढी केली. यानंतर पळ काढल्याचे निष्पन्न झाले आहे. कोथरुड पोलीस घर झडतीत गेल्यावर त्यांना बेसिनमध्ये दाढी केल्याचे दिसून आले. त्याने ओळख लपवण्यासाठी तसेच सीसीटीव्हीत ओळखले जाऊ नये, म्हणून असे केले होते. कोथरुड पोलीस त्याचा माग काढत वसईपर्यंत गेले होते. मात्र, तेथे त्याने मोबाइल फेकून दिल्याने तपासात तांत्रिक अडथळा निर्माण झाला. तरीही पोलिसांनी त्याचा माग दुसऱ्या राज्यापर्यंत काढला. तेथून पुढचे लोकेशन मात्र पोलिसांना समजले नाही.