पुणे – बारामती लोकसभा मतदार संघात समावेश असलेला हवेली-पुरंदर विधानसभा मतदार संघ नेहमीच बारामतीतील उमेदवारासाठी महत्त्वाचा ठरत आला आहे. शहर आणि ग्रामिण भागाचा समावेश असल्याकारणाने या भागातील मतदारांचा कौल नेहमीच फिरता राहिलेला आहे.
त्यातच यावेळी राजकारणात मोठे फेरबदल झाल्याकारणाने या तालुक्यातील मतदार कोणाच्या पारड्यात आपले दान टाकतात यावर बारामती लोकसभेचा निकाल ठरू शकतो किमान येथील मत उमेदवाराला विजयी लीड घेण्यात मदत करू शकतात, याच कारणातून इतर बारामतीतील इतर चार विधानसभा मतदार संघापेक्षा हवेली-पुरंदर मतदारसंघ बारामती लोकसभेसाठी महत्त्वाचा ठरतो.
बारामती मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडुन तुतारी चिन्हावर सुप्रिया सुळे यांना अपक्षेप्रमाणे उमेदवारी दिली गेली तर घड्याळ चिन्हासह अजित पवार गट महायुतीत भाजप सोबत असल्याने भाजपने बारामती मतदार संघ घड्याळसाठी सोडला या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली. यामुळे या मतदार संघात पवार विरूद्ध पवार अशी लढत होत असताना हवेली-पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना थेट विरोध करीत या मतदार संघातून लढणार असल्याचे घोषित केले होते.
मात्र, हवेली-पुरंदर मतदार संघातील मतांचे महत्त्व लक्षात घेत शिवतारे यांचे बंड महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मोडून काढले. त्यानंतर अजित पवार यांनी सुटेकेचा निश्वास सोडला. परंतु, हवेली-पुरंदरचे माजी आमदार शिवतारे यांनी माघार घेतल्याने त्याचा उलट परिणाम दिसून येत आहे तर अजित पवार गटाच्या पाठीराख्यांनी मात्र शिवतारे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हवेली-पुरदंरमधील शिवतारे यांच्या भूमिकेमुळे मतदारांत भिन्न मतं निर्माण झाली आहेत.
त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मतदारांच्या मतांना मोठे महत्त्व आले आहे. या दोन्ही तालुक्यात ग्रामिण तसेच शहरी अशा विचारांचा मतदार असल्याकारणाने कोणत्या मुद्यावर तो उमेदवाराला नाकारणार तसेच मतदान करणार हे अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत सांगता येत नाही,त्यातच सध्याच्या राजकीय घडामोडीतून तर या तालुक्यातून मत मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटाल मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
हवेली आणि पुरंदरमधील बलस्थाने
शरद पवार गट
– ज्येष्ठ कार्यकर्त्यांची संख्या अधिक
– उद्योग, व्यापारात मोठे केलेल्यांची संख्या अधिक
– सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांशी संपर्क
– दोन्ही तालुक्यातील गावांत थेट मोठा संपर्क
– दुसरी फळी नव्याने वेगात तयार करण्यात यश
अजित पवार गट
– जुन्या जाणत्या पदाधिकार्यांची साथसोबत
– पदाधिकार्यांच्या अनुभवा मोठा फायदा
– युवा कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा
– अनेक कामे मार्गी लावल्याने हक्काची लोकं
– सर्वच क्षेत्रातील मान्यवरांशी थेट संपर्क
मतदान (2011 जनगणनेनुसार)
पुरंदर संपूर्ण तालुका : 2,36,862
पुरूष मतदार : 1,28,160
महिला मतदार : 1,08,662
हवेली : तालुक्यातील हडपसर महसूल मंडळ (पुणे महापालिकेतील प्रभाग म्हणून गणले गेलेले क्षेत्र वगळून), हडपसर महसूल मंडळातील पिसोळी गांव, (वॉर्ड क्र. 135), उंड्री गांव, (वॉर्ड क्र. 136), आंबेगांव बुद्रुक गांव, (वॉर्ड क्र. 141), आंबेगांव खुर्द (वॉर्ड क्र.142) मधील मतदार.